कांदे-टोमॅटो रस्त्यावर फेकत राष्ट्रवादीकडूनच अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 11:42 AM2023-10-07T11:42:23+5:302023-10-07T11:48:30+5:30
टॉमेटोचे भाव घसरल्याने शेतकरी रोज आंदोलन करीत आहेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे कांदा लिलाव १३ दिवस सुरू होते.
भगवान गायकवाड
वणी ( नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील वणी येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यापुढे राष्ट्रवादी पवार गटाने टोमॅटो, कांदे फेकत केले आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम हिरे,संतोष रेहरे आदींसह शेतकरी कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अजित पवार हे आज दिंडोरी दौऱ्यावर आहेत. त्यांचे दिंडोरी अवनखेड लखमापूर फाटा वणी येथे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. मात्र ते वणी सप्तशृंग गडाकडे मार्गस्थ होत असताना वणी-कळवण चौफुली वर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष शाम हिरे,विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कांदा,टोमॅटो रस्त्यावर फेकत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
कांदा व टोमॅटोचे कोसळलेल्या भावा संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.यानंतर अजित पवार यांचा ताफा सप्तशृंग गडाकडे रवाना झाला.अजित पवार यांचे समवेत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार दिलीप बनकर आदी सहभागी होते.तत्पूर्वी दिंडोरी येथे बाजार समिती उप सभापती कैलास मवाळ,उपनगराध्यक्ष दीपक जाधव,लताताई बोरस्ते,अनिकेत बोरस्ते आदी कार्यकर्त्यांनी स्वागत करत विविध मागण्यांचे निवेदन दिले.अवंनखेड येथे जगदंबा माता देवस्थान चे भक्त निवास चे भूमिपूजन अजित पवार यांचे हस्ते झाले.यावेळी ग्रामस्थांशी पवार यांनी संवाद साधला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे लखमापूर फाटा येथे सहा जेसीबी मधून पुष्पवृष्टी तसेच क्रेन द्वारे भव्य पुष्पहार घालत भव्य स्वागत करण्यात आले. कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे ,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र उफाडे,तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे,संपत कड,राहुल कावळे,दत्तू गटकळ,नितीन भालेराव, परिक्षीत देशमुख आदी कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.