नाशिक : शहरात पाणीप्रश्नावरून घमासान सुरू असताना आणि महापालिकेकडूनही पाणीकपाती-बरोबरच नव्याने नळजोडणीबाबत दक्षता घेतली जात असताना गुरुवारी वकीलवाडीत महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे नळजोडणीचा प्रयत्न जागरूक नागरिकांनी हाणून पाडला. नागरिकांनी हरकत घेतल्यानंतर संबंधित मजुरांनी तेथून पलायन केले.गुरुवारी वकीलवाडीत रस्ता खोदण्याचे काम काही मजुरांमार्फत सुरू होते. यावेळी आसपासच्या जागरूक नागरिकांनी संबंधित मजुरांना विचारणा केली असता नळजोडणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी त्याबाबत परवानगीची पावती मागितली असता मजुरांनी महापालिकेचे अधिकारी वाडिले यांचे नाव सांगितले आणि त्यांच्याकडेच पावती असल्याचे सांगितले. नागरिकांनी तेथूनच वाडिले यांचा फोन नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. परंतु प्रकरण अंगाशी येईल या भीतीने सदर मजुरांनी तेथून पळ काढला. सदर नळजोडणी ही व्यावसायिक कारणासाठी घेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापालिकेने याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. (प्रतिनिधी)
अनधिकृत नळजोडणीचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2015 11:11 PM