विषारी औषध सेवन केल्याने एकाचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील मीरगाव येथील ४५ वर्षीय इसमाने विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशोक रामचंद्र शेळके (४५) यांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्यांच्यावर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वडझिरे येथे वृक्षारोपण
सिन्नर : तालुक्यातील वडझिरे येथे ग्रामपंचायत व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय व सार्वजनिक वाचनालयास वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तात्रय बोडके, जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, उपजिल्हाध्यक्ष संतोष गायधनी, जिल्हाप्रमुख आयटी सेल कमलाकर शेलार, दिव्यांग क्रांती संघटनेचे सुनील जगताप, मंगेश खरे, ऋषिकेश टापसे यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. यावेळी सरपंच सुनीता आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्युतपंप चोरणाऱ्यांवर गुन्हा
सिन्नर: तालुक्यातील शहा येथील दोन विहिरीतून विद्युत जलपंप चोरणाऱ्या दोघा संशयितांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा येथील भाऊसाहेब गोराणे यांची ७ हजार रुपये किमतीचा, तर विलास गोराणे यांची ५ हजार रुपये किमतीचा जलपंप चोरीला गेला होता. पोलिसांनी दोन संशयितांवर विद्युत जलपंपाची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.