सुनील शिंदे ल्ल घोटीस्थळ - घोटी शहरातील श्रीरामवाडीवेळ - दुपारी १२.३० वाजतादेशात घडणाऱ्या विविध चुकीच्या घटनांना कंटाळून एका तरुण स्वत:ला जाळून घेण्याचे जाहीर करतो ...कौलारू घरात घरगुती वापराच्या गॅसची नळी कापलेली... एका हातात लाईटर... जवळून जाणाऱ्या तरुणांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर धावपळ आणि पळापळ... बघ्यांची गर्दी.. तरुणाला समजावण्याचे प्रयत्न... पोलिसांना पाचारण... मात्र तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही... अथक प्रयत्नानंतर तो आपल्या निर्णयापासून परावृत्त ... आणि गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास ... अन् दोन तासांच्या आत्महत्त्येच्या नाट्यावर पडदा पडतो. घोटीतील श्रीरामवाडी या मध्यमवर्गीयांच्या वस्तीत एका कौलारू घरात हेमंत लहामगे (२५) या युवकाने स्वत:ला कोंडून घेतले. देशात घडणाऱ्या विविध चुकीच्या घटनांमुळे आपण व्यथित झालो असून, आपण स्वत:ला संपवित आहोत असे जाहीर केले. त्याने घरगुती गॅसची नळी कापून त्यातून गॅस बाहेर येऊ दिला. दुसऱ्या हातात लायटर घेऊन आपण स्वत:ला पेटवून घेत असल्याचे जाहीर केले. हा सारा प्रकार जवळून जाणाऱ्या दुसऱ्या युवकाच्या लक्षात आला. त्याने आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. हळूहळू बघ्याची एकच गर्दी जमा झाली. जो तो आपापल्या पद्धतीने त्या युवकास समजविण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु कोणालाच तो प्रतिसाद देत नव्हता. खबरदारी म्हणून या घरालगतच्या नागरिकांना सुरिक्षत स्थळी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या व बघ्यातील एकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोन पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी या युवकाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु देशातील सद्याच्या स्थितीचा आपणास वीट आला असून, आपणास आपले जीवन संपवायचे आहे असे त्याने पोलिसांना ठासून सांगितले. हा युवक त्याच्या मित्राचे ऐकेल या समजुतीपोटी दौंडत येथील गोपाळ शिंदे या त्याच्या सहकाऱ्याला बोलविण्यात आले. परंतु त्याचाही प्रयत्न निष्फळ ठरला. जोपर्यंत सक्षम अधिकारी व प्रसिद्धिमाध्यमांचे प्रतिनिधी आपल्याशी संवाद साधत नाहीत तोपर्यंत आपण हा प्रकार थांबविणार नाही, असे त्याने सर्वांना सांगितल्याने सर्वच हतबल झाले. अखेर पोलिसांनी अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण केले. घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या युवकाची कशीबशी समजूत काढल्यानंतर तब्बल दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर हा युवक पोलिसांना शरण गेला आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
देशातील घटनांचा वीट आला म्हणून आत्महत्त्येचा प्रयत्न केला !
By admin | Published: June 14, 2014 1:19 AM