गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यात वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथे शनिवारी (दि.१२) मध्यरात्री १:३० वाजता चोरी करण्यास आलेल्या अज्ञात चोरट्यांचे चारही ठिकाणी चोरी करण्याचे प्रयत्न निष्फळ झाल्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागले.
नांदूरवैद्य येथे गेल्या अनेक वर्षांपासून चोरीची एकही घटना घडली नसल्यामुळे अचानक सकाळी चोरी झाल्याचे मेसेज तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सोशल मीडियाच्या माध्यमातून यायला सुरुवात झाल्यानंतर या घटनेवर सुरुवातीला कोणालाही विश्वासच बसेना. यामुळेच संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत ग्रामपंचायतीच्यावतीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेच वाडिव-हे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्यावेळी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे शनिवारी रात्री १:३० वाजता वंजारवाडीमार्गे दोन ते तीन चोरांनी गावात शिरण्यापूर्वी गावाच्या तोंडाशीच असलेल्या सैन्य दलातील जवान नामदेव गोडसे यांच्या बंगल्याचे गेट उघडून आत प्रवेश केला. यानंतर या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला असता कुत्रे भुंकल्यामुळे या चोरट्यांनी पळ काढत गावात येत गावाच्या तोंडाशीच असलेल्या भैरवनाथ किराणा दुकानाचे मालक तुकाराम मनोहर मुसळे यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे विरुध्द दिशेला फिरवून त्यानंतर सरळ मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने जात मध्येच दिलीप कर्पे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो त्यांचा प्रयत्न सपशेल फसल्याने या चोरट्यांनी थोडेसे पुढे एका बोळीच्या मार्गाने जाऊन पुढील असणाऱ्या ज्ञानेश्वर खंडू सायखेडे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडले.
या घराचे मालक ज्ञानेश्वर सायखेडे हे नाशिकला स्थायिक असल्यामुळे कुलूप तोडूनही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुढील गावाकडे म्हणजे बेलगाव कुऱ्हे या गावाकडे वळविला. या गावातील ग्रामस्थ साखरझोपेत असल्याचा फायदा घेत त्यांनी दुग्ध व्यावसायिक सुदाम धोंगडे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी माघारीत जात पलायन केले. यामुळे या दोन्हीही गावातील ग्रामस्थ अतिशय भयभीत झाले असून, नशीब बलवत्तर म्हणून या चोरट्यांनी मोठा हल्ला किंवा चोरी केली नाही, अशी चर्चा दोन्हीही गावातील नागरिकांमध्ये होत आहे. याच पार्श्वभूमीवर गावातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच पोलिसांना रात्रीच्यावेळी गस्त घालण्याची मागणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.