पिंपळगाव बसवंत : कोरोना काळात बॅंकांसह फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते वसूल करू नये, असे शासकीय आदेश असतानाही नाशिकच्या एका फायनान्स कंपनीने पिंपळगाव बसवंत येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे गुरुवारी (दि.१२) अक्षरशः अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या समयसूचकतेने या प्रकरणावर माफीनाम्याने पडदा पडला असला तरी फायनान्स कंपन्यांची मुजोरगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने कोरोना महामारीच्या आधी नाशिक येथील एका फायनान्सकडून वैयक्तिक कर्ज घेतले होते. मात्र, संबंधित पदाधिकाऱ्याचे पिंपळगाव बसस्थानकात दुकान असून, बससेवा बंद असल्याने व्यवसाय ठप्प झाला. व्यक्तिगत कर्ज काढल्यानंतर केवळ तीन महिन्यांचे हप्ते भरले नाही म्हणून फायनान्सच्या दोन कर्मचाऱ्यांनी थेट या पदाधिकाऱ्याचे अपहरणच करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या पदाधिकाऱ्याने सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांना फोन लावताच काजळे यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. सदर कर्मचारी नरमल्याने त्यांनी सदर पदाधिकाऱ्यास पुन्हा पिंपळगाव बसस्थानकावर आणून सोडले. परंतु, पिंपळगावचे पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी तोपर्यंत पोलिसांना पाचारण केल्याने फायनान्सच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. शेवटी सदर पदाधिकाऱ्यानेच दोन्ही कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड जावी म्हणून माघार घेतल्याने केवळ माफीनाम्याच्या या घटनेवर पडदा पडला.
फायनान्सकडून उडवाउडवीची उत्तरे
पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिकास नाशिक येथील एका फायनान्स कंपनीकडून त्रास दिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. दरम्यान, फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.