सिडको : एक लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने येथील शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न शुक्रवारी सायंकाळी झाला. पण सुदैवाने बडगुजर या हल्ल्यातून बचावले. परिसरातील सराईत गुन्हेगार गणेश वाघ (ऊर्फ गण्या कावळ्या) याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात बडगुजर यांच्या तक्रारीवरून जीवे ठार मारण्याचा, विना परवाना शस्त्र बाळगण्याचा तसेच खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायंकाळी बडगुजर हे सहाच्या दरम्यान सावतानगर येथील संपर्क कार्यालयाबाहेर बसले होते. यावेळी काही नागरिकही तेथे उपस्थित होते. सव्वासहाच्या दरम्यान दोघे जण येथे आले. त्यातील एकाने मला तुम्ही ओळखले का? असे सांगून मी गण्या कावळ्या.. तुम्हाला सिडकोत राजकारण करायचे असेल तर आम्हाला एक लाख रुपये द्या. बडगुजर यांनी नकार दिल्यानंतर गण्याने बडगुजर यांच्यावर हात उगारला. बडगुजर यांनी या दोघांपैकी एकाला मारल्यानंतर अन्य एक जण दुसरीकडे थांबला होता. तो धावत आला त्याने या दोघांकडे बॅगमधून कोयते काढून दिले. या घटनेमुळे बडगुजर यांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका मोटारसायलकवर बसून ते निघून गेल्याने हल्ल्यातून ते बचावले. त्यानंतर या तिघांनी कोयते फिरवत काही वेळ या परिसरात दहशत पसरविली. याचवेळी अंबड पोलीस ठाण्याचे हवालदार एम. एल. गायकवाड हे येथून जात असताना त्यांनी ही घटना पाहिली. त्यांनी या युवकांना हटकण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही कोयता उगारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे तिघे फरार झाले. घटनेचे वृत्त समजल्यानंतर येथे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर व कर्मचारी आले व बंदोबस्त वाढविण्यात आला. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, देवानंद बिरारी, दिलीप दातीर, सुभाष गायधनी हे कार्यकर्त्यांसह अंबड पोलीस ठाण्यात आले. आरोपींना तातडीने अटक करावी व गुन्हा दाखल करावा अशी मागणी बोरस्ते यांनी केली. दरम्यान, बडगुजर यांच्या तक्रारीवरून गण्या कावळ्या याच्यासह तिघांवर खंडणी मागण्याचा व जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील गण्या कावळ्या हा येथील विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल झालेले आहेत. तो ठाणे येथील एका गुन्ह्यातून सुटून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुधाकर बडगुजर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
By admin | Published: September 26, 2015 12:17 AM