नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे? साहित्य संमेलन हा मोठा उत्सव असतो. तो जास्त खर्चिक न होता साहित्याभिमुख, सोपा सुटसुटीत व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांचीही भूमिका आहे. ती पटल्याने आपणही साहित्य संमेलन घेऊ शकतो, असे वाटून सार्वजनिक वाचनालय नाशिकमधील इतर संस्थांच्या सहकार्याने हे शिवधनुष्य उचलू शकतो असे लक्षात आले. त्यामुळे आम्ही सावानाच्या वतीने नाशिककरांकडून निमंत्रण देण्यासाठी औरंगाबाद येथे गेलो होतो.यापूर्वी २००५ साली स्व. वसंतराव पवारांच्या पूर्ण अधिकाराने अतिशय देखणे, भव्यसंमेलन इथेच केले होते. त्यात माझा सक्रिय सहभाग होताच, वाचनालयाचे इतर पदाधिकारीही संमेलनात काम करीत होतेच. तो अनुभव गाठीशी आहेच. शिवाय सध्याचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना नाट्यसंमेलन आखणीचा अनुभव होताच म्हणून हा घाट घातला आहे. नाशिककरांचा उत्साही सक्रिय सहभाग आम्हालाही अभिप्रेत आहेच. संमेलन मिळेल न मिळेल, पण त्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे. शिवाय मराठवाडा साहित्य परिषदेचे वाचनालयाशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे मोठे साहित्यिक उत्सवाचे काम इथे होऊ शकते, असा विश्वास वाटतो. त्यामुळे नाशिकमध्ये साहित्यिक चळवळीला आणखी चालना मिळेल.नाशिकला उज्ज्वल साहित्यपरंपरा आहे. या नगरीत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक होऊन गेलेत. त्यानंतरच्या पिढीने ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. आजही जिल्ह्यातून जोमदार लेखक, कवी लिहित आहेत. वेगवेगळ्या छोट्या- मोठ्या साहित्यसंस्था नाशकात काम करीत आहेत. त्यांच्या पाठिंब्यावरच नाशकात कला साहित्याचे नवे वातावरण पुन्हा सुरू होईल आणि एकजुटीने हेही काम होईल ही खात्री आहे. सर्व नाशिककर पाठीशी राहतीलच, असा विश्वास आहे. - किशोर पाठक
संमेलन साहित्याभिमुख होण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:27 AM