नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात पहिल्या व दुसऱ्या शाहीस्नान मिरवणुकीत वाढत्या वाहनरथ संख्येमुळे तिन्ही अनी आखाड्याांच्या मिरवणुकांचे रथ एकमेकांत घुसून मोठा गोंधळ उडाला होता. तिसऱ्या शाही मिरवणुकीत असा गोंधळ उठू नये म्हणून एका वाहन रथात दोनपेक्षा जास्त महंतांना बसवून वाहनरथांची संख्या आटोक्यात आणता येईल काय? यावर मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला प्रमुख महंतांमध्ये विचार विनिमय सुरू होता, परंतु खालशांचे महंत ही गोष्ट मान्य करतील काय याचीही चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.अखिल भारतीय श्री पंच दिगंबर आखाड्याचे ४३० खालसे असून, श्री महंत, महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर आदिंची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे शाही मिरवणुकीत दिगंबर आखाड्याची वाहनरथ संख्यादेखील सर्वाधिक असते. त्याखालोखाल निर्वणी अनी आखाड्यांच्या खालशांची सव्वाशेच्या आसपास असून, निर्मोहीची खालसा संख्या पाऊणशेपर्यंत आहे. त्यातच दिगंबर आखाड्याची मिरवणूक ही मध्यभागी असल्याने शेवटी मिरवणूक असलेल्या आखाड्याच्या खालशांची मोठी कुचंबणा होते. कारण दिगंबरची मिरवणूक वाढत्या वाहन संख्येमुळे लांबल्याने शाहीस्नानासाठीदेखील विलंब होतो आणि वाहनरथांना खूप वेळ ताटकळत मिरवणूक मार्गावर शेवटी थांबावे लागते. त्यामुळे पहिल्या शाहीस्नानाच्या मिरवणुकीदरम्यान शेवटच्या क्रमांक राहिलेल्या निर्मोही आखाड्याची वाहने दिंगबरची मिरवणूक अर्ध्यावर आली असताना मध्येच घुसली होती. तोच प्रकार दुसऱ्या मिरवणुकीत देखील घडला होता. निर्वाणी आखाड्याचे वाहनरथ दिंगबर आखाड्याच्या मिरवणुकीत घुसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर काही वरिष्ठ महंतांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळून मिरवणूक शांततेत पार पडली. असाच प्रकार तिसऱ्यांदादेखील घडू नये म्हणून निर्वाणी आणि निर्मोही आखाड्याचे महंत काळजी घेत आहेत. आमच्या आखाड्याची संख्या कमी असल्याने मिरवणूक आटोपशीरच असते. यावेळीही आम्ही पहिल्याच क्रमांकावर मिरवणुकीत आहोत, असे निर्मोहीचे अध्यक्ष महंत राजेंद्रदास यांनी सांगितले, परंतु ज्या आखाड्यात महंताची आणि महामंडलेश्वरांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यांनी एकाच वाहन रथावर विराजमान व्हावे, असेही स्पष्ट केले, तर दुसरीकडे दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत रामकिशोर शास्त्री म्हणाले की, आमचा आखाडा प्रमुख असून, मध्यभागी असतो. (प्रतिनिधी)
वाहनांची संख्या आटोक्यात आणण्याचा महंतांचा प्रयत्न
By admin | Published: September 18, 2015 12:32 AM