नाशिकरोड :गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, बलात्कार, सोनसाखळी चोरी, गंभीर अपघात या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सिंहस्थ पर्वणीच्या बंदोबस्ताची जबाबदारी नाशिकरोड पोलिसांनी पार पाडली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ खेडी समाविष्ट असून, भौगोलिकदृष्ट्या मोठी हद्द असली तरी त्या मानाने लोकसंख्या कमी आहे. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयासह अनेक महत्त्वाची कार्यालय, कारखाने नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने आंदोलन, मोर्चा, उपोषण यांचा बंदोबस्त व नियोजन हे पोलीस ठाण्याच्या पाचवीलाच पुजले आहे.वर्षभरात गंभीर अपघाताच्या ४९ घटना घडल्या असून, त्यामध्ये नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे, तर सोनसाखळी चोरीच्या ११ व इतर २ जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत.हुंड्यासाठी छळवणुकीच्या गुन्ह्यात एका गुन्ह्याने वाढ झाली आहे, तर अपघातात (फेटल) प्राण गमविणाऱ्यांचे प्रमाणदेखील घटले असून, ३५ वरून २७ वर आले आहे. नवनवीन रस्ते, रस्ता दुभाजक, पथदीप, धोक्याचे-सूचनांचे फलक, रिफ्लेक्टर, पोलीस बॅरिकेटस् यामुळे वाहनधारक वेळीच सावधान होत असल्याने अपघाताला आळा बसत आहे. मात्र बेशिस्त वाहनचालक व वाहतूक पोलिसांची पोलीस म्हणून ‘छाप’ पडत नसल्याने वाहतुकीची कोंडी व मनाला लागेल तशी वाहने उभी करत असल्याने हमरस्त्यावर व चौकाचौकात वाहतूक जाम होते. गेल्यावर्षी इतक्याच खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत, तर घरफोडीच्या गुन्ह्यातदेखील घट झाली असून, १९ गुन्हे कागदोपत्री दाखल आहेत. नाशिकरोड पोलिसांनी घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाइल चोरी, सोनसाखळी चोरी, मंदिरातील चोरी असे अनेक गुन्हे उघडकीस आणून वाहने, रोकड, सोने जप्त केले आहेत. ग्रामीण खेड्यांची हद्द मोठी असल्याने त्या भागातील किरकोळ वादविवाद, मारामाऱ्या, अपघात, पाण्याची मोटार, जनावरे चोरी असे अत्यंत कमी प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. टवाळखोरी, छेडछाड, दुचाकीधारक युवकांची राईडिंग हे प्रकार मात्र गल्लोगल्ली वाढले आहेत. तर नाशिकरोड रेल्वे-बसस्थानक परिसरात रात्री नेहमीच वादविवाद-मारामाऱ्या, प्रवाशांना धमकावणे अशा अनेक घटना सातत्याने घडतात. बाहेरगावचे प्रवासी तक्रार देत नसल्याने ती बाब कागदावर येत नाही. वर्षभरात शेकडो मोबाइल चोरीला गेले आहेत. कायदा-सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या अनेक घटना पोलिसांच्या वेळीत हस्तक्षेपामुळे टळल्यादेखील आहेत.
खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरीत वाढ
By admin | Published: December 29, 2015 10:28 PM