नाशिक : शहरात कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील निर्बंध अधिक कडक केले आहेत. मात्र, शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रशासकीय कामकाजासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यास १५ टक्के किंवा ५ यापैकी जे जास्त असेल त्या क्षमतेसह हजर राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, नाशिक शहरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी होत असली तरी शैक्षणिक क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांना या निर्बंधांतून काहीशी सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठामध्ये प्रशासकीय कामकाजासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यास एकूण मनुष्यबळाच्या १५ टक्के किंवा पाच व्यक्ती यापैकी जे जास्त असेल त्या क्षमतेसह हजर राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अशा संस्थांमध्ये परीक्षेसंबंधित कामकाजासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजन टेस्ट किंवा ट्रुनॅट टेस्टही चाचणी बंधनकारक आहे. तसेच पर्यवेक्षकांनाही या टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.