नाशिक : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मराठा विद्या प्रसारक समाजाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ३९० बेरोजगार युवक-युवतींनी मुलाखती दिल्या. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या मेळाव्याप्रसंगी विविध उपलब्ध २५१ पदांचा लाभ बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी किमान कौशल्य विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित होत्या. यादरम्यान, शासनाच्या विविध सात स्वयंरोजगार महामंडळांनी आपले केंद्र उभारून बेरोजगार युवकांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून उपलब्ध पदानुसार माहिती दिली. सर्व उमेदवारांनी मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जावे, योग्य त्या पदासाठी कौशल्य प्राप्त करण्याकरिता शासनाच्या कौशल्य विकास योजनेचा विनामूल्य लाभ घ्यावा, असे अवाहन सैंदाणे यांनी यावेळी बोलताना केले. दरम्यान, १७ नियुक्तकांकडून मुलाखती घेण्यात आल्या. ४३ उमेदवारांनी दिली भेट १९३ बेरोजगारांची प्राथमिक निवड करण्यात आली. उद्योजकता व स्वयंरोजगाराचे एकूण सात महामंडळांचे केंद्र यावेळी स्थापन करण्यात आले होते. महामंडळांच्या केंद्रावर ४३ उमेदवारांनी भेट दिली. प्रास्ताविक व भूमिका सहायक संचालक संपत चाटे यांनी मांडली.
रोजगार मेळाव्याला ३९० बेरोजगारांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:55 PM