चांदवड : शासन व विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार बुधवारी (दि.२०) श्री नेमिनाथ जैन संस्थेचे महाविद्यालय सुरु झाले, त्यामुळे विद्यार्थी उत्साही दिसत होते. तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालयीन विश्व तरूणाईच्या चैतन्याने झळाळून निघाले. मात्र पहिल्या दिवशी महाविद्यालयात अवघी २० टक्केच उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना सॅनिटाईज करण्यात येत होते. तर, एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसविले जात होते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले आहेत का ?, याची देखील चौकशी करण्यात येत होती. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती वीस ते तीस टक्के होती.
पहिलाच दिवस असल्याकारणाने विद्यार्थी संख्या कमी होती. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी यावेळी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कार्यालयीन बंधू-भगिनी आणि विद्यार्थी वर्गासाठी लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. बहुतेकांचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे. परंतु दुसऱ्या डोसला ८४ दिवस पूर्ण होण्यास बाकी आहेत, त्यामुळे विद्यार्थी थोडेसे संभ्रमात आहेत. महाविद्यालयात यावे की, नाही?, मात्र, शासनाच्या व विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महाविद्यालयाचा पहिला दिवस असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता होती. ज्यांनी एकच डोस घेतला होता त्यांच्या मनात महाविद्यालयात प्रवेश मिळेल की, नाही असे प्रश्नचिन्ह होते, प्राध्यापक देखील किती विद्यार्थी उपस्थित राहतात याबद्दल मोठी उत्सुकता ठेवून होते.
- प्रा. डॉ. तुषार चांदवडकर