शासकीय कार्यालयामध्ये वाढली धावपळ
नाशिक : मार्चअखेर शासकीय कामांचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असल्याने, शासकीय कार्यालयांमधील धावपळ वाढली आहे. कोरोनामुळे आगोदरच कामांना झालेला विलंब आणि कमी निधी, यामुळे रखडलेल्या कामांना आता जानेवारीनंतर गती आली आहे. मार्चपूर्वी कामे पूर्ण करावयाचे असल्याने शासकीय कामांना गती आली आहे.
मॉल्स, प्रदर्शनाना वाढतेय गर्दी
नाशिक : अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जनजीवन सामान्य झाले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडत असल्याने शहरातील छोटेमोठे मॉल्स तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या क्राफ्ट प्रदर्शनांना गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
उपनगर चौकात डांबरीकरणाची गरज
नाशिक: उपनगर सिग्नलकडून मशिदरोडकडे वळणाऱ्या चाौकात अर्धवट पडून असलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. या चौकात अनेक दुकाने, तसेच भाजी विक्रेते बसत असल्याचे सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे या चौकात तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
आरटीओ कॉर्नर बनला धोकादायक
नाशिक: आरटीओजवळून दिंडोरी रोडकडे जाणारा चौक वाहनधारकांनासाठी धोकादायक ठरत आहे. या चौकातून वळणारे वाहने घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. वळण घेणारी वाहने एकमेकांना आदळत असल्याने, किरकोळ अपघाताचे प्रकारही नेहमीच घडत आहेत.
जत्राजवळील भाजीबाजार हटविला
नाशिक : हॉटेल जत्रा परिसरातील सर्व्हिस रोडवर भरविला जाणारा भाजीबाजार हटविण्यात आला आहे. अनधिकृतपणे रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या मार्गावरील वर्दळीमुळे दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. दिवसेंदिवस वाढत जाणारा हा बाजार आता हटविण्यात आला असून, महालक्ष्मीनगर मार्गावर बाजार स्थलांतरित करण्यात आला आहे.
उपनगर परिसरातील उद्यानांचा विकास
नाशिक : उपनगर परिसरातील मातोश्रीनगर येथील उद्यानाचा विकास करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या परिरसरातील उद्यानांची देखभाल-दुरुस्ती करण्याची मागणी केली जात होती. उद्यानात ट्रॅक, लॉन, तसेच बसण्यासाठीचा डोक तयार करण्यात आल्याने, उद्यानाचे सौदर्य अधिकच खुलले आहे.
खोडदेनगर येथील उद्यान दुर्लक्षित
नाशिक : खोडदेनगर, तसेच काठेनगर येथील उद्याने सध्या बंद अवस्थेत असून, परिसरातील नागरिकांना या दोन्ही उद्यानांचा कोणताही उपयोग होत नाही. काठेनगर येथील उद्यान कुलूप बंद करण्यात आले आहे. हिरवेगार हे उद्यान असतानाही बंद ठेवले जात आहे. खोडदेनगर येथील उद्यानात केवळ खेळणीच बसविण्यात आल्या आहेत. उद्यानाचा एकही शोभिवंत रोप लावण्यात आलेले नाही.
ग्रामीण भागातील बसेस फुल्ल
नाशिक : शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसेला गर्दी वाढल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातून तालुक्याच्या ठिकाणी सोडण्यात आलेल्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे बसेस पूर्ण क्षमतेने वाहतूक करीत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडली आहे.