नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची कोंडी करून आपली भूमिका संदिग्ध ठेवल्यामुळे सेनेचे नरेंद्र दराडे हवालदिल झाले असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नाशिक भेटीत यासंदर्भात निर्णयाची अपेक्षा धरून बसलेल्या शिवसेनेला आता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिक दौºयाचे वेध लागले आहेत. शिवसेनेप्रमाणेच जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांनादेखील महाजन काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी भाजपा व शिवसेनेने प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार उभे करून अप्रत्यक्ष युती केली असली तरी, त्याबाबतची घोषणा मात्र केलेली नाही. एकमेकांच्या सहमतीने उमेदवार उभे करण्यात आले, परंतु ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार असेल तेथे सेनेने व जेथे सेनेचा उमेदवार असेल तेथे भाजपाने काय भूमिका घ्यावी याबाबत संदिग्धता ठेवली आहे. त्यासंदर्भातील कोणतेही आदेश दोन्ही पक्षांनी आपल्या मतदारांना दिलेले नाहीत. त्यामुळे नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी दाखल केली असली, तरी भाजपाच्या मतांवर डोळा ठेवून जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांनी उमेदवारी जाहीर करून तिरंगी लढतीत रंग भरला आहे. विशेष म्हणजे, कोकणी यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून भाजपा नगरसेवकांच्या स्वाक्षºया असून, गेल्या आठ दिवसांपासून भाजपाचे पदाधिकारी व जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर हे उघड उघड कोकणी यांचा प्रचार करीत असल्यामुळे कोकणींच्या उमेदवारीला भाजपाची फूस असल्याचाच अर्थ काढला जात आहे. तथापि, याबाबत ना शिवसेनेने भाजपाला जाब विचारला, ना भाजपानेही शिवसेनेला पूरक भूमिका घेतली. अशा संदिग्ध वातावरणात विधान परिषदेची निवडणूक रंगात आलेली असताना दराडे मात्र हवालदिल झाले आहेत. शिवसेनेनंतर भाजपाचे संख्याबळ दुसºया क्रमांकावर आहे. स्थानिक भाजपाने वरिष्ठांचे आदेश नसल्याचे सांगत शिवसेनेपासून दूर झाले आहेत.शिवसेनेचे शिष्टमंडळ भेट घेणारसुरगाणा येथे सामूहिक विवाहाच्या निमित्ताने नाशिक दौºयावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा शिवसेना बाळगून असून, यासंदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. महाजन यांच्या भेटीबाबत परवेज कोकणीदेखील उत्सुक असल्यामुळे येत्या दोन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:39 AM