नाशिक : विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या विविध गटांच्या वतीने शहरासह विविध उपनगरीय भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने संचलन करण्यात आले. खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, डोक्यावर काळी टोपी अन् खांद्यावर काठी अशा पोशाखात संघाच्या स्वयंसेवकांनी शहरातील विविध भागांमधून संचलन करत नागरिकांचे लक्ष वेधले. गंगापूररोडवरील जेहान सर्कलवरील रामनगर येथून भोसला गटाच्या वतीने संचलनाला सकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र नेहेते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत ध्वज उभारणी करण्यात आली. यावेळी शहराचे संघचालक विजय कदम, गटप्रमुख राजेश जाधव, डॉ. विनायक गोविलकर, संजय चंद्रात्रे, अतुल देशपांडे, रवि बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संचलन, सावरकरनगर या भागातून मार्गस्थ होत पुन्हा जेहान सर्कल येथे समारोप करण्यात आला. यावेळी नेहेते यांनी डॉ. हेडगेवार यांनी ओळखलेली शिस्त व देशाचे संघटन या दोन महत्त्वाच्या बाबींवर मनोगतातून प्रकाश टाकला. सहभागी स्वयंसेवकांकडून वाद्यवादन केले जात होते. पंचवटी गटाच्या वतीने गोदाकाठापासून संचलनाला सुरुवात करण्यात आली. आडगाव-म्हसरूळ गटाच्या वतीने ओमनगर परिसरात संचलन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. सुमारे चारशे स्वयंसेवक यामध्ये सहभागी झाले होते. संचलनाच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भगवा ध्वज फडकावत पुष्पवृष्टी करून ‘भारत माता की जय’ घोषणा देऊन संचलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ब्रिजमोहन चौधरी, नाना साळुंके, गटप्रमुख मनोज पटेल, संतोष मोरे आदी उपस्थित होते.सिडको भागात संचलनाच्या प्रारंभी मुंबईतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे शाळिग्राम भोळे व विभाग कार्यवाह संजय कुलकर्णी यांना स्वागत प्रणाम देण्यात आला. पवननगर परिसरात संचलन झाले. विशेष आकर्षण असलेल्या संघाच्या घोषाचे नेतृत्व सुनील पाटील यांनी केले. अश्वारूढ पवन पुराणिक यांनी भगवा ध्वज घेत संचलनाचे निरीक्षण केले. दरम्यान, ठिकठिकाणी संचलनाचे स्वागत करण्यात आले. बाल स्वयंसेवकांनीही संचलनात सहभाग घेतला.
संघ परिवाराच्या शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:12 AM