नाशिक : शहरासह जिल्ह्यात निवडणुकीची मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली. यंदाचे मुख्य आकर्षण ठरले ते ‘सखी मतदान केंद्र’. केंद्रांच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी, फुलांचे तोरण, फुगे लावून केलेली सजावट अन् एकसमान पोशाखात कर्तव्य बजावण्यासाठी हजर असलेल्या महिला कर्मचारी, हे या मतदान केंद्रांचे वैशिष्ट्य. त्यामुळे हे केंद्र अन्य मतदान केंद्रांच्या तुलनेत ‘जरा हटके’ असेच होते.निवडणूक आयोगाकडून यावर्षी महिला कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकी एक याप्रमाणे शहरात चार मतदारसंघांत चार सखी मतदान केंद्रे सोपविण्यात आली होती. या महिला कर्मचाऱ्यांनी केंद्रं आकर्षक रांगोळी काढून फुलांच्या माळा, फुगे लावून आकर्षक पद्धतीने सजवली होती. केंद्रात येणाºया मतदारांना गुलाबपुष्प देऊन महिला कर्मचारी स्वागत करतानाही प्रारंभी दिसून आले.पोलीस कर्मचाºयांपासून पोलिंग एजंटपर्यंतचा सर्वच कारभार सखींनी अर्थात महिलांनी सुरळीतपणे पार पाडला. महिला कर्मचाºयांना निवडणूक मतदानाचा अधिकाधिक अनुभव यावा, या उद्देशाने प्रशासनाकडून ‘सखी मतदान केंद्र’ ही संकल्पना राबविण्यात आली. या केंद्रांवरील सर्व कारभार जिल्हा निवडणूक आयोगाने सखींच्या हाती सोपविला होता. मतदारांची नावे शोधून नोंदी करण्यापासून तर शाई लावण्यापर्यंत सर्व कामे महिला कर्मचारी करतानाचे चित्र पहावयास मिळाले.या केंद्रांचे कुतूहल मतदारांनाही वाटले. मतदारांनी आकर्षक अशा या मतदान केंद्रांबाहेर आवारात उभे राहून ‘सेल्फी’देखील क्लिक केली. शहरातील म्हसरूळच्या काकासाहेब देवधर शाळेसह अन्य चार ठिकाणी सखी मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. केंद्रांवर कारभार जरी महिलांकडून हाकला जात असला तरी सदर केंद्रांत महिला, पुरुष मतदारांना प्रवेश खुला होता. त्यामुळे या मतदान केंद्रांमध्ये नागरिकांनी आनंदात मतदानाचा हक्क बजावला.
‘सखी मतदान केंद्र’ ठरले आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:54 AM