सायखेडा : दुचाकी चालविताना गाडीच्या हॅन्डलजवळ भला मोठा साप दिसणं हे एखाद्या सिनेमात बघावी अशी घटना आज कोठुरकरांना प्रत्यक्ष अनुभवयास आली. ठिकाण निफाड-कोठुरे रस्ता. वेळ सकाळी साडे दहा वाजता. नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय,कोठुरे येथील शिक्षक सुधाकर निकम हे दुचाकीने शाळेत जात असतांना त्यांना दुचाकीच्या हँडलजवळ काहीतरी हालचाल होत असतानाची जाणवली पण रस्त्याने मार्गक्र मण करीत असलेल्या निकम यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले, मात्र काही क्षणातच दुचाकीच्या हँडलजवळ अचानकपणे सापाने मान वर काढल्यामुळे गांगरून गेलेल्या निकम यांनी परिस्थितीचे भान राखून स्वत:ला सावरले आणि हळुवारपणे दुचाकी रस्त्याच्या कडेला बाजूला थांबवून मोटारसायकलचा ताबा सोडला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना तसेच प्रवाशांना समजताच कोठुरे येथील सर्पमित्र अतुल गायकवाड यांना कळविण्यात आले. सापानेही लपाछपीचा खेळ सुरू करत दुचाकीवरील अडचणीच्या भागांत लपत होता. पण बराच वेळ होऊनही साप काही हाती लागेना, त्यानंतर कोठुरे येथील गॅरेजवरील फिटरला बोलावण्यात आल्यानंतर त्यांनी सदर दुचाकीवर साप लपत असलेला एक-एक लपण्याचा पार्ट काढण्यास सुरु वात केली. पण साप ही चपळ असल्याने तोही जागा बदलत राहिला, मात्र त्यानंतर अथक प्रयत्नाने गायकवाड यांनी सदर सापाला पकडले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदर दुचाकीवरील साप हा धामण जातीचा असल्याचे गायकवाड यांनी सांगितले,मात्र नंतर त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती.
अबब ! चालत्या दुचाकीवर साप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 3:54 PM