पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून बाजार समितीतील सर्व परवानेधारक खरेदीदार, व्यापारी यांची बैठक शुक्रवारी (दि. ९) मुख्य प्रशासक, सचिव व प्रशासक सदस्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. येवला बाजार समितीची स्थापना १२ मार्च १९५५ रोजी झाली असून प्रत्यक्ष कामकाज १५ सप्टेंबर १९५७ रोजी सुरू झालेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत दर अमावास्येला येवला बाजार समितीत कांदा, मका व भुसार मालासह धान्याचे लिलाव बंद राहत होते. परंतु शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन व शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून येवला बाजार समितीने मागील ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढून यापुढे प्रत्येक अमावास्येला इतर बाजार समित्यांप्रमाणे शेतमाल लिलाव चालू ठेवण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. बैठकीस मुख्य प्रशासक वसंत पवार, प्रशासक सदस्य भानुदास जाधव, सचिव के.आर. व्यापारे, व्यापारी नंदकिशोर आट्टल, सुमित समदडीया, जयेश ठाकूर, योगेश सोनी, प्रणव समदडिया, शंकरशेठ कदम, अर्शद शेख आदी उपस्थित होते.
इन्फो
कांदा विक्री वाढणार
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दिवस लिलावाचे कामकाज व्हावे याकरिता प्रयत्न करण्यात येत असून अमावास्येच्या दिवशी लिलाव चालू राहणार असल्याने वर्षात बारा दिवस वाढीव होणार आहेत. त्यामुळे २ ते ३ लाख क्विंटल कांदा विक्री वाढणार असल्याचे पवार यांनी सांगितले.