लासलगाव, शेखर देसाई: बाजार समित्यांवर प्रशासक नेमू नयेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार सोमवारी लासलगाव सह जिल्ह्यातील सर्व १४ बाजार समित्यांमधील व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सुमारे ४० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे .
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करू नये या मागणीसाठी सोमवारी बाजार समिती बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्या ला नाशिक जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आज लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमालाचे लिलाव बंद राहिले. नाशिक जिल्ह्यात 14 कृषी उत्पन्न बाजार समिती असून सर्वत्र व्यवहार बंद आहेत.
नेहमी गजबजलेली लासलगावची कांदा बाजार पेठ आज ओस पडलेली दिसून आली . केंद्र सरकारने बाजार समित्यांच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत बंदचे आवाहन केले होते. संघटनेने पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलाज शर्मा, जिल्हा निबंधक फय्याद मुलानी यांना निवेदन दिले .