मनमाड (हर्षद गद्रे ): नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत व्यापाऱ्यांनी हमाली, वराई, तोलाई, बाजार पट्टी मधून न कापण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लिलाव प्रक्रियेत अडथळा येऊ नये, शेतकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी गुरुवार ४ एप्रिल पासून मनमाड बाजार समितीतील कांदा, मका, धान्याचे लिलाव पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामुळे मनमाड बाजार समिती आवारात शुकशुकाट होता.
नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने याबाबत ठाम भूमिका घेतली आहे. आज नाशिक येथे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.