नाशिक : पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव ४९ फटाके गाळ्यांना परवानगी नाकारली खरी; परंतु नंतर विक्रेत्यांच्या दबावाला बळी पडून पालिकेने पुन्हा याच गाळ्यांचे शनिवारी तातडीने लिलाव घेतले. त्यानंतर विक्रेत्यांनी पोलीस परवानगीसाठी प्रयत्न केले. राजकारणी मंडळींनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात यश न आल्याने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन विक्रेत्यांना रिकाम्या हातानी परतावे लागले.महापालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यात सहा विभागांत १६० गाळ्यांचे लिलाव काढण्यात आले होते. अर्थात, त्यावेळीच पोलिसांच्या परवानगीला अधिन राहून हे लिलाव होतील, ज्याठिकाणी पोलीस गाळ्यांना ना हरकत दाखला देणार नाहीत त्या गाळ्यांचे लिलाव रद्द होतील असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी आणि शुक्रवारी लिलाव घेण्यात आले; परंतु सहाही विभागांत पोलिसांनी ज्या गाळ्यांना परवानगी नाकारली अशा ४९ गाळ्यांचे लिलाव पालिकेने रद्द केले. अर्थात, पोलिसांनी ज्या ठिकाणी आक्षेप घेतले त्यातील बहुतांश ठिकाणी वर्षानुवर्षे गाळ्यांचा लिलाव केला जातो आणि विक्रेते तेथे व्यवसाय करतात. असे असताना पोलिसांनी अचानक परवानगी नाकारल्याने विक्रेत्यांची अडचण झाली. त्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या यंत्रणेवर दबाव आणला आणि रद्द करण्यात आलेले लिलाव पूर्ववत घ्यावेत, पोलिसांची परवानगी आपण स्वत: आणू असे सांगितले. काही नगरसेवकांनीही हस्तक्षेप केला आणि त्यानंतर पालिकाही तयार झाली. त्यानुसार आज फटाक्यांच्या गाळ्यांचे लिलाव पालिकेच्या मुख्यालयात पार पडले. त्यानंतर या विक्रेत्यांनी पोलीस आयुक्त आणि संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ठाण मांडले, परंतु परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. पोलिसांची परवानगी नसताना महापालिकेने काढलेल्या लिलावामुळेदेखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे...इन्फो...दरवर्षीप्रमाणे विक्रीसाठी या विक्रेत्यांनी लाखो रुपयांचे फटाके खरेदी केले असून, ते संबंधित विक्रेत्यांच्या गुदामात दाखल झाले आहेत. आता या फटाक्यांची विक्री करता आली नाही तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
पोलिसांनी नाकारलेल्या गाळ्यांचेही लिलाव
By admin | Published: October 19, 2014 12:21 AM