नाशिक : महापालिकेने मार्चअखेरपूर्वीच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडल्यानंतर घरपट्टीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांविरोधी जप्तीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत ४१५ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली असून, येत्या १५ दिवसांत जप्त मिळकतींचा लिलाव काढून विक्री केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली आहे. मनपाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ११० कोटी रुपये ठेवले आहे. दि. ३० मार्चअखेर घरपट्टीची वसुली ९१ कोटी २० लाखांवर जाऊन पोहोचली आहे. मागील वर्षी ३० मार्चअखेर ८४ कोटी ४ लाख रुपयांची वसुली होऊ शकली होती. कर विभागाने थकबाकीदारांविरुद्ध मिळकती जप्त करण्याची कारवाई सुरू केल्याने वसुलीत सुमारे सात कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. महापालिकेने पाणीपट्टीचे उद्दिष्ट मार्चअखेरपूर्वीच ओलांडले आहे. महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात पाणीपट्टीचे उद्दिष्ट ४२ कोटी रुपये ठेवले होते. ३० मार्चअखेर महापालिकेने ४३ कोटी ४८ लाख रुपये पाणीपट्टी वसूल करत उद्दिष्ट्यपूर्ती केली आहे. मागील वर्षी ३० मार्चअखेर २७ कोटी ९५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल होऊ शकली होती. यंदा मात्र पाणीपट्टीची बिले पाठविण्यात आल्याने सुमारे १५ कोटींची भर पडली आहे. घरपट्टी वसुलीच्या उद्दिष्टापासून महापालिका अजूनही १९ कोटी रुपयांनी मागे आहे. आर्थिक वर्षाचा एकच दिवस उरला आहे. त्यामुळे शुक्रवारी गुड फ्रायडेची सुटी असतानाही वसुली विभागाकडून उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू होते. थकबाकी न भरणाऱ्या मिळकतधारकांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत महापालिकेने ४१५ मिळकती जप्त केल्या असून, त्यातील सुमारे ३० ते ३५ मिळकतधारकांनी प्रतिसाद दिला आहे. ज्यांनी मुदतीत रकमेचा भरणा केला नाही अशा मिळकतधारकांच्या जप्त मालमत्तांची विक्री केली जाणार आहे.सावानाकडून थकबाकीचा भरणामहापालिकेने थकबाकी न भरणाºया कॉँग्रेस भवन आणि सार्वजनिक वाचनालयाच्या मिळकतींवर टांच आणली होती. त्यानंतर, तातडीने सार्वजनिक वाचनालयाने कार्यकारिणी मंडळाची बैठक बोलावत थकबाकी भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सावानाने सुमारे १२ लाख रुपयांची थकबाकी भरली असल्याची माहिती महापालिका कर विभागाने दिली आहे. मात्र, अद्याप कॉँग्रेस कमिटीकडून थकबाकीचा भरणा होऊ शकलेला नाही. कॉँग्रेस कमिटीने याबाबतची माहिती प्रदेश कॉँग्रेसला कळविली आहे. याशिवाय, वर्गणी गोळा करून थकबाकी भरण्यात येणार असल्याचे शहराध्यक्षांनी स्पष्ट केले होते. त्याबाबत शुक्रवारी (दि.३०) हालचाल दिसून आली नाही.
जप्त मालमत्तांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:59 AM