देवळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात कांदा लिलावासाठी वाहनांना लागू केलेली टोकन देण्याची पद्धत बुधवारपासून (दि.२०) बंद केली असल्याची माहिती बाजार समितीचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे.एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये व आवारात गर्दी कमी व्हावी यासाठी बाजार समितीने कांदा लिलावासाठी येणाऱ्या वाहनांना टोकन देण्याचा उपक्र म सुरू केला होता. बाजार समिती आवाराच्या मुख्य गेटवर टोकन दिलेल्या ३०० वाहनांना आवारात प्रवेश देण्यात येत असे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती.बाजार समितीनेही टोकन पद्धत आता बंद केली आहे. दररोज ३०० ट्रॅक्टर वाहनांचा लिलाव करण्यात येईल. सकाळी ६ वाजेपासून ते ९.३० वाजेपर्यंत लिलावासाठी आलेल्या वाहनांना बाजार समितीच्या आवारात शिस्तीत व रांगेत प्रवेश देण्यात येईल.शासनाच्या आदेशान्वये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू रहावे यासाठी बाजार समिती प्रशासनाने कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायांचे कसोशीने पालन केले आहे. यामुळे कांद्याचे लिलाव नियमतिपणे सुरू ठेवण्यात बाजार समिती प्रशासन यशस्वी झाले आहे. लॉक डाऊन काळात अपवादात्मक परिस्थिती सोडली तर देवळा बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरूहोते.
देवळा बाजार समितीत लिलावाची टोकन पद्धत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 9:47 PM