नाशिक : ‘श्रावणात सप्तसूर’ या अविस्मरणीय मराठी गीतांच्या सप्तसूर मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा हॉलमध्ये बालाजी म्युझिकल इव्हेंट आयोजित या मैफलीची सुरुवात गुपचूप गुपचूप या चित्रपटातील ‘पाहिले न मी तुला’ या गीताने गायक अजित जाधव यांनी केली. या गीतानंतर ‘का रे दुरावा’, ‘जेव्हा तुझ्या बटांना’, ‘चिंब पावसानं’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘गोमू संगतीनं’, ‘शुक्र तारा मंदवारा’, ‘गालावर खळी’, ‘कधी तू रिमझिम’, ‘नाव मोठं लक्षण खोटं’ अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपट गीतांचे सादरीकरण गायक वीरेंद्रसिंग परदेशी, अजित जाधव, अस्लम शेख, चंचल चौधरी आदी कलाकारांनी केले. ‘श्रावणात सप्तसूर’ या मैफलीद्वारे गत आठवणींना उजाळा मिळाल्याने रसिक श्रोते रममान झाले होते. यावेळी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे ज्येष्ठ गायक कलाकार शुभदा बाम-तांबट व नवीन तांबट यांना सेवानिवृत्त प्राध्यापिका कल्पना बोंडे व नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा असोसिएशनचे संस्थापक उमेश गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.गेल्या चार वर्षांपासून संस्थेच्या वतीने दरवर्षी ज्येष्ठ गायक कलाकारांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत असल्याची माहिती बालाजी म्युुझिकल इव्हेंटचे वीरेंद्रसिंग परदेशी यांनी दिली. कार्यक्र माचे प्रास्ताविक रोहिणी पांडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत व्यवहारे यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा किन्हीकर यांनी, तर निवेदन धनेश जोशी यांनी केले. मैफलीत प्रवेश सर्वांसाठी खुला असल्याने रसिकश्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रावण गीतातील मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:08 AM