मालेगाव कॅम्प : मालेगावी सिनेरसिकांसाठी चित्रपटगृहे सुरू झाली, परंतु त्यास हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने चित्रपटगृहांचे मालक काहीसे हतबल झाले आहेत.
मालेगाव शहर सिनेरसिकांमुळे प्रसिद्ध आहे. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी-शर्तींसह चित्रपटगृहे सुरू झाली. शहरात सुमारे १५ चित्रपटगृहे आहेत. यातील पाचसहा गृहे विविध प्रकारच्या कारणांमुळे कायमची बंद झाली आहे. लाॅकडाऊननंतरच्या नवीन नियमानुसार सर्व चित्रपटगृहे सुरू होणे सिनेरसिकांना अपेक्षित होते, पण त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या. शहरातील मोजकी चारपाच सिनेमागृहे सुरू झाली आहेत, तर उर्वरित पाचसहा सिनेमागृहे अद्यापही बंद आहेत. जी सुरू आहेत, त्यामध्ये आवडते सिनेमे लागले नसल्याने प्रेक्षकांनी तिकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांंनी चिंता व्यक्त केली आहे. गेली सहासात महिने सिनेमागृहे बंद होती. कर्मचारीवर्गाला घरातूनच वेतन द्यावे लागले. पुन्हा सिनेमागृहे सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलली जाईल, अशी अपेक्षा फोल ठरली. या परिस्थितीत बदल होण्याची प्रतीक्षा चित्रपटगृहचालकांमध्ये आहे.