नाशिक : ‘ग्रंथ हेच गुरू’ असे म्हटले जाते. जे ज्ञान गुरू देऊ शकत नाही ते ग्रंथ किंवा पुस्तकातून मिळते. परंतु अंध-दिव्यांग व्यक्तींना पुस्तके वाचनाची अडचण निर्माण होते. यासाठी संत ज्ञानेश्वर वाचनालयाने अशा व्यक्तींसाठी आॅडिओ लायब्ररी सुरू केली असून, त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना समान संधी आणि समान कायदा १९९५च्या कलम ४० अंतर्गत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अशा व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने निधीद्वारे कॉलेजरोड भागातील कृषिनगर येथील संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालयाला आॅडिओ लायब्ररी संच उपलब्ध करून दिला. त्यात अॅम्प्लिफायर, डीव्हीडी प्लेअर, रेकॉर्डर कॅसेट्सचा संच आणि हेडफोन आदी साहित्याचा समावेश होता. या संघाचा अंध-दिव्यांग व्यक्तींना लाभ होत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. नितीन महाजन यांनी दिली. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी साधना कळवणकर, नितीन चौधरी, संजय जाधव, चंद्रकांत जामदार, बळीराम नाईक आदी उपस्थित होते.
अंध-दिव्यांगांसाठी ‘आॅडिओ लायब्ररी’ची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:13 AM