पंचवटी : औरंगाबादरोडवर अनेक लॉन्स तसेच मंगल कार्यालयांची संख्या मोठी असल्याने त्यातच सध्या लग्नसराई सुरू झाल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका व राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे. या नेहमीच्या वाहन कोंडीमुळे सायंकाळी औरंगाबाद रस्त्याने वाहने नेताना वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, शिवाय त्याचा परिणाम मुंबई-आग्रा महामार्गावरही होत असल्याने तेथेही तासन्तास वाहने अडकून पडत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून आग्रारोडच्या उड्डाणपुलाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल जत्रा, रासबिहारी चौफुली, अमृतधामपर्यंत चोवीस तास वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या रांगा दुतर्फा लागत असल्याने नागरिकांना इच्छितस्थळी जाण्यास विलंबसहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.लग्नसराईमुळे बहुतांशी गोरज मुहूर्तावर विवाह सोहळे असल्याने व जवळजवळ लॉन्स व कार्यालय असल्यामुळे सध्या दैनंदिन सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका चौक, मुंबई-आग्रा महामार्ग भागात तासन्तास उभे राहून वाहतूक कोंडी सोडवावी लागत असल्याचे चित्र दिसून येते.नेहमीच कोंडीमुख्य रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम जोड रस्त्यांवर होत आहे. घाईघाईत जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी, चारचाकी वाहन जोड रस्त्याने बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात, मात्र रस्त्यावर उभ्या राहणाºया चारचाकी व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. मंगळवारी सायंकाळी अशाच प्रकारे सुमारे दीड तास वाहने रस्त्यावर दुतर्फा अडकून पडल्याने अखेर पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी परिश्रम घेतले.
औरंगाबादरोडला लग्नसराईमुळे कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:34 AM