नाशिक : रिक्षाचालकांबाबत नेहमीच ओरड केली जाते. मात्र शहरातील सर्व रिक्षाचालक सारखेच नसून त्यामध्ये काही प्रामाणिक रिक्षाचालकही आहेत़ बंगळुरू येथील रुचिता पंगारिया या पतीसह नाशिकमध्ये आल्या असता त्यांची रिक्षाप्रवासात विसरलेली पर्स व रोख रक्कम आयुब अब्दुल रहेमान सय्यद या रिक्षाचालकाने परत केली. या प्रामाणिक रिक्षाचालकाचा भद्रकाली पोलिसांनी सत्कार केला आहे़
बंगळुरू येथील रुचिता पंगारिया या त्यांच्या पतीसह रविवारी (दि़१२) नाशिकला आल्या होत्या़ जिल्हा परिषदेपासून ते काळाराम मंदिरापर्यंत रिक्षाने गेल्यानंतर चालकास पैसे दिले मात्र त्यांची पर्स रिक्षातच राहिली़ या पर्समध्ये मोबाइल, ८ हजार रुपये रोख, पासपोर्ट, मुंबई व बंगळुरू विमानाचे तिकीट, पॅनकार्ड व महत्त्वाचे कागदपत्र होते़ रिक्षामध्ये पर्स विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून सहायक पोलीस निरीक्षक विशाल गिरी यांना माहिती दिली़ गिरी यांनी नियंत्रण कक्षास कळवून पोलीस शिपाई फरीद इनामदार यांना सोबत घेत जिल्हा परिषदेजवळील रिक्षाचालकांशी संपर्क साधला असता एमएच १५, एके ६४४२ क्रमांकाची रिक्षा असल्याचे समजले़
एव्हाना रिक्षाचालक आयुब अब्दुल रहेमान सय्यद हा भद्रकाली पोलीस ठाण्यात पोहोचला होता व रिक्षामध्ये प्रवाशाची पर्स राहिल्याचे सांगितले़ यानंतर रुचिता पंगारिया व त्यांचे पती यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची पर्स परत केली़ रिक्षात विसरलेली पर्स परत मिळताच पंगारिया दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक विशाल गिरी, पोलीस उपनिरीक्षक सुनील कासर्ले, पोलीस शिपाई फरीद इनामदार यांनी रिक्षाचालक सय्यद यांचा सत्कार केला आहे़