नाशिक : सध्या सर्वत्र होणाऱ्या एकांकिका स्पर्धांत एकांकिकेची संहिता नवी असावी अशी अट असते. त्यामुळे पूर्वीच्या लेखकांच्या गाजलेल्या एकांकिका संहिता आजच्या पिढीतील हौशी कलाकारांना सादर करण्याची संधी मिळत नाही. तसेच रसिकांना या एकांकिका पहायलाही मिळत नाहीत. जुनी २-३ अंकी नाटके पुनर्जीवित करून नाट्य निर्माते रसिकांसाठी व्यावसायिक रंगभूमीवर सादर करतात, पण हौशी रंगभूमीवर पूर्वी गाजलेल्या एकांकिका आज कुठेही सादर होत नाहीत. प्रयोग मालाडने ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ ही संकल्पना एकांकिका स्पर्धोत्सवाच्या रूपाने प्रत्यक्षात आणली आहेत. यासाठी नाशिकमधील कलाकारांनी तयारी सुरू केली आहे. नाशिक केंद्रातील स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे, मुंबईच्या उपनगरातील ‘‘प्रयोग मालाड’’ या संस्थेने २०१४ मध्ये प्रथमच ‘लेखक एक नाट्यछटा अनेक’ हा एकांकिका स्पर्धोत्सव आयोजित केला. या स्पर्धोत्सवाची संकल्पना इतर एकांकिका स्पर्धेपेक्षा वेगळी आहे. या स्पर्धोत्सवात १९७०-८०च्या दशकात गाजलेल्या एकाच लेखकाच्या एकांकिका, सोडत पद्धतीने स्पर्धक संस्थांना देण्यात येतात. ही सोडत व कार्यशाळा मुंबईत दि.१९ आॅगस्ट २०१८ रोजी होणार आहे. हा स्पर्धाेत्सव म्हणजे लेखकाला दिलेली मानवंदना आहे, असे प्रयोग मालाडचे कार्याध्यक्ष प्रदीप देवरूखकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे हौशी कलाकारांबरोबरच व्यावसायिककलाकारही या स्पर्धोत्सवात सहभागी होऊ शकतात. ‘लेखक एक नाट्यछटा अनेक’ या स्पर्धोत्सवाला दरवर्षी प्रतिसाद मिळतो आहे. यंदा प्रथमच या स्पर्धोत्वाची प्राथमिक फेरी मुंबईसह रत्नागिरी, पुणे, नाशिक आणि सोलापूर अशा पाच केंद्रांवर होणार आहे. प्राथमिक फेरीच्या आयोजनासाठी स्थानिक संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. नाशिक केंद्रासाठी सहआयोजन म्हणून ‘नाट्यरसिक’ नाशिक संस्थेने ‘प्रयोग मालाड’बरोबर आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. नाशिक केंद्रातील प्राथमिक फेरी २७ सप्टेंबर २०१८ रोजी नाशिकमध्ये होणार आहे, तर अंतिम फेरी दि. १३ व १४ आॅक्टोबर २०१८ रोजी मुंबईत प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह येथे होणार आहे.
‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:00 AM