नाशिक : जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत रविवारी दिवसभर कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. प्रभाग ३५ मध्ये ४७.७० तर प्रभाग ३६ मध्ये ५३.६२ टक्के इतके मतदान झाले. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे. जेलरोड येथील प्रभाग ३५ ब व ३६ ब च्या पोटनिवडणुकीमध्ये रविवारी सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. गेल्या दोन दिवसांपासून निवडणुकीच्या मुद्द्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली असता सर्वांचे लक्ष मतदान प्रक्रियेकडे लागले होते. मात्र, मतदारांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभाग ३६ मधील नेहरूनगर मनपा शाळा या मतदान केंद्रावरतर सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून बुथ उभारण्यात आले होते. या बुथवरही सकाळपासूनच गर्दी दिसून आली. पोटनिवडणूक चारही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाल्याने या निवडणुकीसाठी प्रचंड चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे चारही पक्षांच्या प्रमुख उमेदवारांकडून मतदानासाठीदेखील जोरदार नियोजन करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळपासून सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १ वाजेपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आदि पक्षांचे लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, शहराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक प्रभागांमध्ये तळ ठोकून होते. मतदान केंद्रांपर्यंत मतदारांना आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. सकाळपासून सुरू झालेला मतदारांचा ओघ दुपारी १ वाजेनंतर काहीसा मावळला. त्यानंतर मात्र ४ वाजेनंतर पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी झाली. प्रभाग ३५ करिता जेलरोड पाण्याची टाकी येथील सानेगुरुजी मनपा शाळेत १ ते ७ खोल्या तर बाल येशू सेवादन शाळेत ३ खोल्या असे एकूण १० खोल्यांमध्ये मतदान कक्ष उभारण्यात आले होते. सर्वाधिक मतदार मनपा शाळेत असल्याने याठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. प्रभाग ३६ साठी जेलरोड, के. एन. केला शाळा, भीमनगर मनपा व्यायाम शाळेत नेहरूनगर मनपा शाळेमध्ये मतदान कक्ष होते. जेलरोड, कॅनॉलरोड झोपडपट्टीतील सर्व मतदान नेहरूनगर मनपा शाळेत असल्याने याठिकाणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. राजकीय पक्षांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रांजवळ मतदारांव्यतिरिक्त कुणालाही फिरकू दिले जात नव्हते. त्यातच पैसे वाटप होत असल्याच्या अनेकदा अफवा पसरल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ झाली. सायंकाळपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असलीतरी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)
सरासरी ५0 टक्के मतदान
By admin | Published: August 29, 2016 1:19 AM