नाशिक : लॉकडाऊननंतर बारा दिवसांनी सुरू झालेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २४) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत अधिकाधिक २००० रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव बाजार समितीत १६३५ रुपये अधिकाधिक दर मिळाला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ मेपासून कडक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे बाजार समित्यांचे कामकाज पूर्णपणे बंद होते. सोमवारपासून या समित्यांचे कामकाज पूर्ववत होऊन विविध अटी-शर्तींचे पालन करत शेतीमालाच्या लिलावाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत पहिल्याच दिवशी ४९३ वाहनांमधून १०३३७ क्विंटल इतकी उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. सर्व वाहनांमधील लिलाव पूर्ण झाला उन्हाळ कांद्याला किमान ७०० तर सरासरी १४०१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लासलगावी मक्याचीही आवक झाली होती. मक्याला १५३८ रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३८० ट्रॅक्टर आणि ३१० जीप इतकी कांद्याची आवक झाली होती. येथे गावठी कांद्याला सरासरी १५०१ रुपये तर अधिकाधिक २०२० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पिंपळगावी झाली २५ हजार क्विंटल आवकपिंपळगाव बसवंत : येथील बाजार समिती आवारात रविवारी (दि. २३) सायंकाळपासूनच बाजार समितीमध्ये परिसरात मोठी गर्दी झाली होती. सोमवारी (दि. २४) कामकाज सुरू झाल्यानंतर कोरोनाचा अहवाल तपासूनच वाहनांना प्रवेश दिला जात होता. पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला २ हजार रुपये क्विंटलला भाव जाहीर झाला. पिंपळगाव बाजार समितीचे ठप्प असलेले कांदा लिलाव दहा दिवसांनंतर सुरू झाल्याने रविवारी सायंकाळी शेकडो वाहने बाजार समिती आवारात दाखल झाली. रविवारीच हजार वाहनांतून सुमारे २५ हजार क्विंटल कांदा आवक झाली होती.
पहिल्याच दिवशी कांद्याला सरासरी १४०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 2:24 AM