लोकमत न्यूज नेटवर्क येवला : येवला तालुक्यात मृगाच्या पावसाने बहुतांशी ठिकाणी दमदार हजेरी लावल्याने खरिप हंगामाच्या आशा वाढल्या आहेत. तालुक्यात सरासरी ७९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात ११५.४ मिमी इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, तर तालुक्याच्या पश्चिम भागातील सावरगाव पंचक्र ोशीत केवळ ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहर परिसरात ७० मिमी पर्जन्यमान आहे. अंदरसूल १०३ मिमी, पाटोदा ८७ मिमी व जळगाव नेऊर ६२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजपावेतो झालेल्या पावसाच्या या नोंदी आहेत. मृग नक्षत्रात यंदा पावसाने सातत्य राखल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. खरीप हंगामातील मका, सोयाबीन, टमाटे, तूर आदि पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. कर्जाच्या ओझ्याने हताश झालेल्या शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. परंतु मृगाच्या पावसाने दमदार हजेरी दिल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी काहीसा आनंदी झाला आहे.
येवल्यात सरासरी ७९.२ मिमी पावसाची नोंद
By admin | Published: June 19, 2017 1:16 AM