सिन्नर : तालुक्यातील सोमठाणे व दापूर या दोन ग्रामपंचायतीच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली. अवघ्या पंधरा मिनिटात या तीन जागांचे निकाल घोषीत करण्यात आले. दापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण महिला जागेवर तिरंगी लढत झाली. यात शारदा अण्णासाहेब आव्हाड (११८) यांनी संगिता नंदू काकड (१०७) व मनिषा परशराम शिंदे (८३) यांचा पराभव केला. तर ३ मतदारांनी नोटाचा वापर केला. सोमठाणे ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. प्रभाग क्र. १ मध्ये सर्वसाधारण महिला जागेवर कमलाबाई एकनाथ साळवे (२९९) यांनी अरुणा कैलास दोडमिसे (१६०) यांचा पराभव केला. ६ जणांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. ३ मध्ये सर्वसाधारण जागेवर विनायक विठ्ठल कोकाटे (२८३) यांनी संजय निवृत्ती धोक्रट (२०९) यांचा पराभव केला. या प्रभागात ४ मतदारांनी नोटाचा वापर केला. तहसीलदार नितीन गवळी, नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन कर्मचाऱ्यांनी १५ मिनिटात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली. निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण केली. दरम्यान, माघारीच्या दिवशी तालुक्यातील चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. हिवरगाव ग्रामपंचायतीच्या तीन व मिठसागरे ग्रामपंचायतीची सदस्यपदाची एक जागा बिनविरोध झाली आहे.
पोटनिवडणुकीत आव्हाड, कोकाटे व साळवे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 4:43 PM