नाशिक : यवतमाळ जिल्ह्यात राबविल्या गेलेल्या ‘आॅपरेशन अवनी’मुळे राज्याच्या वनमंत्रालयासह वनविभाग वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. देशभरातून याविषयी तीव्र संताप व टीकेची झोड उठविली जात आहे. दरम्यान, नाशिक शहरातील वन्यजीवप्रेमींनी गोदावरीच्या काठावर सोमवारी (दि.५) संध्याकाळी एकत्र येत गोदापार्क परिसरात मौन पाळून ‘अवनी’ नावाच्या वाघिणीला श्रध्दांजली वाहिली. तसेच राज्य सरकारच्या या मोहिमेचा निषेध नोंदवून कायद्याच्या नियमांचे मोहिमेदरम्यान झालेल्या उल्लंघनाची केंद्रस्तरीय चौकशीची मागणी केली.नरभक्षक ठरविण्यात आलेल्या अवनी वाघिणीला सर्र्वप्रथम बेशुध्द करण्याचे सर्वोपरी प्रयत्न करावे, त्यामध्ये अपयश आल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र असे करताना कुठल्याही प्रकारे वन्यजीव कायद्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही तसेच नरभक्षक वन्यजिवांना मारण्यापूर्वीच्या अटी-शर्ती पायदळी तुडविल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील वनविभागाला ‘शूट अॅट साईड’सोबत देण्यात आल्या होत्या. मात्र वनविभागाने खासगी शार्पशूटरच्या मदतीने रात्रीच्या सुमारास थेट अवनीच्या घरात जाऊन तिची शिकार केल्याचा आरोप यावेळी वन्यजीवप्रेमी संघटनांनी केला. अवनी जंगलाच्या ‘कोअर’मधून ‘बफर’ झोनमध्ये तिच्या पिलांसह वास्तव्यास होती. बफर झोनमध्ये स्थानिकांचा वाढता हस्तक्षेप ‘अवनी’ला धोक्याचा वाटत होता त्यामुळे ती चवताळली होती कारण अवनी तिच्या लहान पिलांसह तेथे अधिवास करत होती. बफर झोनमध्ये नागरिकांचा वाढता हस्तक्षेप वनविभागाला रोखता आला नाही, त्यामुळे त्यांचे अपयश झाकण्यासाठी अखेर ‘अवनी’चा जीव घेतला गेल्याच्या प्रतिक्रिया यावेळी वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केल्या. या आंदोलनाप्रसंगी उपस्थित वन्यजीवप्रेमींकडून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. तसेच अवनी वाघिणीविषयीची जागृती करण्यासाठी भित्तीपत्रके झळकविण्यात आली. शरण फॉर अॅनिमल, इको-एको फाउण्डेशन, गीव आदी वन्यजीवप्रेमी संघटनांसह निसर्गप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकार यावेळी उपस्थित होते.
‘अवनी’ आॅपरेशनचा वन्यजीवप्रेमींकडून निेषेध : मेणबत्ती प्रज्वलनाने श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 3:23 PM
नरभक्षक वन्यजिवांना मारण्यापूर्वीच्या अटी-शर्ती पायदळी तुडविल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनादेखील वनविभागाला ‘शूट अॅट साईड’सोबत देण्यात आल्या होत्या.
ठळक मुद्देखासगी शार्पशूटरने अवनीच्या घरात जाऊन शिकार केल्याचा आरोप बफर झोनमध्ये नागरिकांचा वाढता हस्तक्षेप