एकलहरे : परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीकडून काटेकोर उपाययोजना केले जातात. मात्र नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही असे दिसते. गावात किंवा आपल्या शेजारी अथवा धार्मिकस्थळात आलेल्या नवीन व्यक्तीची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. किंवा खरी माहिती दडविली जाते असे आढळून आले आहे.एकलहरे परिसरातील सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, ओढा, शिलापूर, लाखलगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी या परिसरातील कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, बचतगट प्रतिनिधी, आंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचे पथक तयार करून नागरिकांमध्ये अनेक माध्यमांतून जनजागृती केली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषध फवारणी केली जाते. गावात नवीन व्यक्ती प्रवेश करू नये म्हणून रस्ते बंद केले जातात.ओढा ग्रामपंचायत हद्दीत १५ फेब्रुवारीनंतर मुलुंड, घाटकोपर, ठाणे, विलेपार्ले, मुंबई, औरंगाबाद, मालेगाव, पुणे या ठिकाणावरून २५ व्यक्ती आल्या. त्यातील बहुतेक १२ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान रेल्वे, बस, खासगी वाहनाने आले. यातील अनेकजण हिंदुस्थाननगर, ओढा शिवार येथे तर तीन जण ओढा येथे आले.या सर्वांना नोटिसा देऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हिंदुस्थाननगरमध्ये सुरू असलेले नवीन बांधकाम बंद करण्याची नोटीस तीन जणांना देण्यात आली आहे. मात्र विनापरवाना ओढा येथील एका धार्मिकस्थळात एक परदेशी व्यक्ती येऊन गेली. त्याची माहिती दडविण्यात आल्याने सरपंच विष्णू पेखळे, ग्रामसेवक गांगुर्डे व गावकऱ्यांनी शोध घेऊन त्या व्यक्तीस पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती मिळते. अशा अनोळखी व्यक्ती आपल्या परिसरात आल्यास त्वरित ग्रामपंचायतीस कळवावे, असे आवाहन ग्रामसेवक गांगुर्डे यांनी केले आहे.एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत दंडे वसाहतीत नवीन पाच व्यक्ती आल्याची नोंद आहे. त्यापैकी एक व्यक्ती १२ मार्चला परदेशातून ओमान येथून तर उर्वरित चौघेजण २२ मार्चला आफ्रिका खंडातील टांझानिया येथून आले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती ग्राम विस्तार अधिकारी सुरेश वाघ यांनी दिली.जाखोरी ग्रामपंचायत हद्दीतील शेतीकामासाठी परजिल्ह्यातून आलेल्या १२ व्यक्तींची नोंद आहे. हे मजूर सोनवणे मळा येथे वास्तव्यास आहेत. कन्नड औरंगाबाद, चाळीसगाव, जळगाव, नांदगाव, नाशिक तालुक्यातील हे मजूर आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक उत्कर्ष पाटील यांनी दिली. या मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाता येत नसल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जाखोरी परिसरात मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
गावात आलेल्या नवीन व्यक्तींची माहिती देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 9:26 PM