नाशिकरोड : देशातील विमा कंपन्या ग्राहकांना दावा भरपाई देताना टाळाटाळ करून ग्राहकांची फसवणूक करत आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात नव्हे तर जागतिक स्तरावर विमा क्षेत्रात करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. लाईफ व नॉनलाईफ असे विम्याचे दोन प्रकार असून, नॉनलाईफ विमामध्ये विमाधारकांना दाव्याची भरपाई देताना विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जाते. विमा नियमाप्रमाणे मोटार दावा- ५० हजार आणि इतर १ लाख रुपयांच्या वरील दावे हे फक्त अधिकृत परवानाधारक सर्व्हेअरकडूनच करणे विमा कंपन्यांवर बंधनकारक आहे. मात्र बहुतांश खासगी विमा कंपन्या आय.आर.टी.ए.चे नियम न जुमानता स्वत:चे कर्मचारी पाठवून सर्व्हे करतात. नवीन अध्यादेशानुसार विमा कंपनी किंवा विमाधारक सर्व्हेअर नियुक्त करू शकतो. त्यामध्ये विमाधारकाने अपघात, नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळविणे बंधकारक आहे. तसेच सर्व्हेअरला ३० दिवसांच्या आत अहवाल देणे बंधनकारक आहे. यामुळे विमाधारकांची विमा कंपन्यांकडून फसवणूक केली जात असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख अनिल गायखे, विलास बोडके, गणेश रनमाळे, मोहन जाट, सोमनाथ कळसकर, नागेश क्षत्रिय आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
विमा कंपन्यांकडून टाळाटाळ
By admin | Published: May 16, 2016 11:40 PM