नाशिक : अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. गेल्या ४० वर्षापासून ते राजकारणात आहेत. दुसरे सांगतील आणि अजीतदादा ऐकतीलअसे म्हणणेच हास्यास्पद आहे. सातत्याने भूमिका बदलणाऱ्या आव्हाड यांनी याप्रकरणी विचार करून बोलायला हवे. आपल्या बोलण्याने लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याचीही काळजी घेतली पाहिजे, असा टोला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला.
बाल व निरीक्षणगृहाच्या विस्तारीत वास्तूच्या उद्घाटनासाठी नाशिक येथे आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. जितेंद्र आव्हाड यांनी अजीत पवार यांच्या भूमिकेसाठी सुनील तटकरे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना आदिती तटकरे यांनी ही भूमिका मांडली. सातत्याने भूमिका बदलणाऱ्या आव्हाड यांनी विचार करून वक्तव्य करावे. लोकांच्या भावना दुखवतील असे वक्तव्य करू नये. श्रीरामाबाबतचे त्यांचे वक्तव्य निषेधार्हच असल्याचे त्या म्हणाल्या.
बालविकास खात्यात काम करताना लेक लाडकी योजनेला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. कुपोषणावर देखील आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. नाशिक जिल्ह्यातील कुपोषणाबाबत स्वतंत्र बैठक घेणार आहे. काही योजनांवर आम्ही महिला सक्षमीकरणासाठीही जोर दिला आहे.
बालमजुरीचे पुर्ण उच्चाटन होण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यासाठी संबंधित विभागांना सुचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
अंगणवाडी सेविकांनी कामावर रुजू व्हावे
संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मी आतापर्यंत ८ वेळा बैठक घेतली आहे. त्यातील अनेक मागण्या पूर्ण झाल्या आहेत.राज्यातील ३ हजार अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मार्गी लावले आहे. त्यांच्या विम्याची रक्कम भरण्यासही सरकार तयार आहे. भाउबीजेची त्यांची मागणीही आम्ही वेळेआधीच पुर्ण केली आहे. २० टक्के वाढीव मागणी आम्ही आधीच मान्य केली आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शन देण्याची आमची मानसीकता आहे. मानधनासंदर्भातील त्यांची मागणी मात्र जुनी आहे. काही गोष्टींना वेळ लागतो. त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी धीर धरावा आणि कामावर रुजू व्हावे असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले.