कोविडमुळे निवडणूक होणार असलेल्या व मुदत संपलेल्या बाजार समिती पदाधिकारी यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली जाणार असल्याचे समजते. मात्र, मुदतवाढ मिळालेल्या पदाधिकाऱ्यांना धोरणात्मक निर्णयाचा अधिकार असणार नाही. याबाबत शासनाचे कुठलेही आदेश बाजार समिती प्रशासनास लेखी स्वरूपात मिळालेले नाहीत. मात्र, लासलगाव बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १० मे रोजी संपणार आहे. मुदत संपुष्टात येत असल्याने राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून समितीवर प्रशासक नेमणुकीसाठी मोठ्या घडामोडी घडत आहेत. येवला पाठोपाठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवरही लवकरच प्रशासक बसणार या चर्चेला उधाण आले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालक मंडळ निवडून आले होते. परंतु भुजबळ हे विविध प्रकरणी कारागृहात जाताच त्यांचे सहकारी भाजपात दाखल झाले. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत राहत बाजार समिती संचालक मंडळ नेहमीच चर्चेत राहिले. आता जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा पुन्हा भुजबळ यांच्याकडे असल्याने कुणाची लॉटरी लागते याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागून आहे.
फोटो - ०६ लासलगाव मार्केट
===Photopath===
060521\06nsk_6_06052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०६ लासलगाव मार्केट