नाशिक : राज्याच्या वन मंत्रालयाने तीन वर्षांत संपूर्ण राज्यभरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात वनमहोत्सव राबवून ५० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वृक्षलागवड अभियानाचे हे दुसरे वर्ष असून, यंदा चार कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय आहे. या लोक ाभिमुख पर्यावरणपूरक उपक्रमाच्या जनजागृतीसाठी वन मंत्रालयाने तयार केलेला खास चित्ररथ मंगळवारी (दि.६) शहरात दाखल झाला. सकाळी वन विभागाचा चित्ररथ त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदान (गोल्फ क्लब) येथे नाशिककरांच्या भेटीसाठी थांबला होता. याठिकाणी दुपारपर्यंत चित्ररथाद्वारे वृक्षलागवड, हॅलो फॉरेस्ट, ग्रीन आर्मी अशा विविध वनविभागाच्या योजनांविषयीची माहिती देण्यात आली. तसेच काही तरूणांनी ग्रीन आर्मी योजनेअंतर्गत नावनोंदणीही केली. दुपारी एक वाजेनंतर येथून चित्ररथ त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाला. यावेळी उपवनसंरक्षक एम.रामानुजम यांनी हिरवा झेंडा दाखविला. याप्रसंगी उपवनसंरक्षक टी.बियुला मती, प्रशांत खैरनार, वृक्षमित्र शेखर गायकवाड यांच्यासह वनरक्षक उपस्थित होते.
संध्याकाळी पुन्हा शहरातील पांडवलेणीजवळ असलेल्या नेहरू वनोद्यान (बॉटनिकल गार्डन) मध्ये चित्ररथ येणार आहे. या चित्ररथामध्ये वृक्षलागवड अभियानाविषयीची प्रबोधनपर माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच हरित सेनेत तरुणांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुकांनी चित्ररथाला भेट देऊन कोणत्याही शासकीय ओळखपत्राची छायांकित प्रत सादर करण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.