ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत घर, परिसर स्वच्छता, सजावट स्पर्धा, जागतिक हात धुवा दिन, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सफाई, स्वच्छ जनावरे, आदर्श गोठा, पाणी शुद्धाता, सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधी चांगले उपक्रम राबविण्यात येतात. सन २०१७-२०१८ च्या पुरस्कारासाठी राज्यस्तरीय तपासणी समितीकडून अवनखेड ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात आली होती. या पुरस्काराची शासनाकडून औपचारिक घोषणा करून त्याचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवनखेड ग्रामपंचायतीचे कौतुक करून नाशिक जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष सत्कार करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजेत्या ग्रामपंचायतींची अधिकृत घोषणा केली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, अप्पर मुख्य सचिव संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील ऑनलाईन कार्यक्रमात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अवनखेड ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र जाधव, ग्रामसेवक विनोद जाधव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.
(फोटो ०१)- अवनखेड ग्रामपंचायतीचा राज्यस्तरीय पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वीकारताना नरेंद्र जाधव, विनोद जाधव, महिला सदस्य.