नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलातर्फे देण्यात येणारा ‘गुणात्मक अन्वेषणासाठीचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न’ पोलीस महासंचालक पुरस्कार नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला आहे़ पिंपळगाव बसवंत येथील सराफी दुकानातील दरोड्याची चोवीस तासात उकल करून सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमाल गुन्हे शाखेने हस्तगत केला होता़ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंज दोरजे यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांच्या पथकास शुक्रवारी (दि़२२) प्रशस्तिपत्रक व रिवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथील अशोक चोपडा यांच्या श्रीनिवास ज्वेलर्स या सराफी पेढीवर २१ सप्टेंबर २०१७ च्या रात्री संशयितांनी दरोडा टाकून २ कोटी ६४ लाख ४ हजार ७१० रुपयांचे सोन्याचे दागिने तिजोरीतून चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांमध्ये करून २ कोटी २१ लाख ६० हजार ५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. याच गुन्ह्याच्या तपासासाठी नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस महासंचालकांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ पोलीस महासंचालकांच्या या पुरस्कारासाठी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, विशाल गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी श्री. दोर्जे यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिलावट, हवालदार बंडू ठाकरे, पोलीस नाईक दिलीप घुले यांना सन्मानित करण्यात आले.
नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:29 AM