मनमाड : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शासनाच्या वतीने आयोजित सजावट स्पर्धेत नांदगाव तालुका स्तरावर बेटी बचाव, बेटी पढाव या विषयाशी संदर्भित द्वितीय पुरस्कार मनमाड येथील श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टला मिळाला आहे. सन्मानपत्र आणि रोख रक्कम रुपये पंधरा हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक जाणिवेचे भान ठेवून बेटी बचाव-बेटी पढाव अभियानांतर्गत जानेवारी २०१५ मध्ये श्री गणेश जयंती या गणपती जन्मदिनी जन्माला येणाऱ्या बालिकेसाठी ११०० रुपयांची दहा वर्षे मुदतीची मुदतठेव नीलमणी कन्या सुरक्षा ठेव नावाने योजना सुरू करण्यात आली आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये बेटी बचाव-बेटी पढाव या अभियानाचे प्रबोधन करणारे डिजिटल फलक मंदिर परिसरात लावण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीकांत घारपुरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, अमोल गोटे, मेघा लोंढे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सचिव नितीन पांडे, विश्वस्त भिकाजी कुलकर्णी, हर्षद गद्रे, नीळकंठ त्रिभुवन, अक्षय सानप या पदाधिकाऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार स्वीकारला. (वार्ताहर)
नीलमणी गणेश मंदिर ट्रस्टला पुरस्कार
By admin | Published: April 25, 2017 1:37 AM