नाशिक : चेन्नई येथील प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पीआयआय) आणि नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल कमिटी फॉर द रेड क्रॉस (आयसीआरसी) यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट लेख आणि छायाचित्रांसाठीचे पुरस्कार ऑनलाइन जाहीर झाले आहेत. यामध्ये नाशिक ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना विशेष पुरस्कार (ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड) जाहीर झाला. कोरोनाच्या काळामध्ये आघाडीवर लढणारे सुपरहिरो या विषयावरील लेख व छायाचित्रांमधून यावर्षी निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट फोटो पुरस्कारात मानवेंद्र वसिष्ठ (पीटीआय), अश्विन प्रसाथ (न्यू इंडियन एक्स्प्रेस ) आणि रिंकू राज (मल्याळी मनोरमा) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. नाशिकच्या रहिवासी क्षेत्रात इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. एका आपत्तीग्रस्त कुटुंबाला अग्निशामक दल व आपत्ती निवारण पथकाने रबरी बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढल्याच्या या छायाचित्राला पारितोषिक मिळाले आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मानवतेला धरून पत्रकारिता करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येत असतात. यंदा या पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे.