नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अनेक ठिकाणी त्याबाबत गैरसमज आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्यावतीने कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ सोमवारी (दि. १५) सकाळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आला. कोविड विरुद्धची लढाई अजून संपलेली नाही. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे म्हणून सर्व नागरिकांनी खबरदारी ठेवणे गरजेचे आहे.
आपल्या देशात लसीकरण जोमाने सुरू आहे. याबद्दल कोणती ही भीती न बाळगता सर्व
नागरिकांनी साथ दिली तर ही लढाई आपण जिंकू शकू, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी केले. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, उपायुक्त (महसूल) गोरख गाडीलकर, उपायुक्त (प्रशासन) प्रवीण कुमार देवरे, प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे आदी उपस्थित होते.
प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यात या महाअभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत एक विशेष जनजागृती रथाच्या माध्यमातून
कोविड लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत विषयी लोकशाहीर पथक तसेच ऑडियो व व्हिडिओ संदेशाच्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. हे जनजागृती रथ जिल्ह्यातील विविध
तालुक्यांमध्ये जनजागृती करणार आहेत. कोविड लसीकरणाच्या संदर्भात काही लाेकांमध्ये अजूनही गैरसमज आहे. हे गैरसमज दूर करण्यावर आणि शासनाने ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसार लसीकरणात सहकार्य करण्यासाठी प्रेरित
करण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे.