इंदिरानगर : महापालिकेच्या वतीने इंदिरानगर ते शालिमार चक्री बससेवा सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. शहर वाहतूक बससेवेच्या वतीने सुमारे २० वर्षांपूर्वी नागरिकांच्या मागणीनुसार इंदिरानगर ते शालिमार चक्री बससेवा सुरू होती त्यामुळे परिसरातील उपनगरातील विद्यार्थी व नागरिकांची सोय होत होती.
मात्र ही बससेवा बंद करण्यात आली त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बस पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत आहे.
पीपीटीव्दारे दिली पालकांना माहिती
नाशिक : मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित शिशुविहार व बालक मंदिर इंग्रजी विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची पालक-शिक्षक संघाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक दृष्टिकोनातून संपन्न झाली. यावेळी नवीन पालक-शिक्षक सभासदांचे स्वागत करण्यात आले. तसेच येणाऱ्या वर्षातील विविध उपक्रम आणि विद्यार्थी संलग्न योजना यावर
पीपीटीव्दारे माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. दिलीप बेळगावकर, संस्थेचे सेक्रेटरी हेमंत देशपांडे, पालक नितीन गर्गे, प्रशांत नाईक, मुखाध्यापिका डॉ. अंजली सक्सेना यांच्यासह पालक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तणनाशक फवारणीला प्राधान्य
नाशिक : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिके जोमात असून, पिकांबरोबरच शेतामध्ये उगवलेले तण काढण्याच्या कामाची आता लगबग सुरू झाली आहे. पावसामुळे तण मोठ्या प्रमाणात उगवलेले असल्यामुळे निंदणीसाठी मजुरांकडून अवाचे सवा मजुरीची मागणी करण्यात येत आहे. यामुळे अनेक शेतकरी तणनाशक फवारणीला पसंती देत असल्याचे दिसते. औषधांमुळे कमी खर्चात आणि अल्पवेळेत तण जळून जात असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
पळसे येथील कार्यालय हलवा
विल्होळी : पिंपळद, नाशिक ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक महेशकुमार शिंदे यांना निवेदन देण्यात आले. पिंपळद जाधवाडी सिटी सर्व्हे कार्यालय पळसे येथे असून, पिंपळद येथून बऱ्याच अंतरावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हे सिटी सर्व्हे ऑफिस नाशिक भूमिअभिलेख कार्यालयात करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सरपंच अलका झोंबाड, उपसरपंच निर्मला कड, ग्रामविकास अधिकारी भास्कर पाडवी, सामाजिक कार्यकर्ते विलास कड, भाऊसाहेब झोंबाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. (२८ विल्होळी)