रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात दररोज शेकडो दुचाकीस्वारांना मृत्यूचा सामना करावा लागतो. त्यात सर्वाधिक वाहनचालकांना डोक्याला मार लागल्याने मृत्यूला कवटळावे लागते. हात-पाय कुठेही जखम झाली तरी ती भरून काढता येते. मात्र, डोक्याला मार लागल्यानंतर त्यातून सावरण्याची संधी क्वचीतच एखाद्याला मिळते. डोके सलामत राहिले तर उर्वरीत जीवनही समाधानाने जगता येवू शकते. त्यासाठी हेल्मेट हाच एकमेव सुरक्षित पर्याय असून प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे यासाठी सिन्नर पोलीस ठाण्याकडून जागृती करण्यात येत आहे. हेल्मेट वापराचे फायदे दाखवणारे अनेक होल्डींग्ज, बॅनर्स शहर व परिसरात लावण्यात आले असून पोलिसांकडून प्रबोधनासाठी राबविण्यात येत असलेली मोहिम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. ‘हेल्मेट’ म्हणजे स्व:ताबरोरच कुटुंबाचेही संरक्षण, सरडक सुरक्षा जीवन रक्षा, जो सुरक्षासे दोस्ती तोडेगा- वह एक दिन दुनिया छोडेगा यासह अनेक घोषणा लावलेले फलक सिन्नरकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. मोटार वाहन कायदान्वये हेल्मेटसक्ती करण्यात येत असल्याकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधले जात आहे. सिन्नर-नाशिक, सिन्नर-पुणे, सिन्नर-शिर्डी महामार्गावर बॅरिकेटसह विविध मोक्याच्या ठिकाणी हे फलक लावण्यात आले असून जीवन किरती अनमोल आहे. त्याचेही महत्व त्यात विषद करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी थांबून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराबाबत व एक फेब्रुवारीपासून आमलात येत असलेल्या हेल्मेट सक्तीची माहिती देण्यात येत आहेत.
हेल्मेट वापरण्यासाठी सिन्नर पोलिसांकडून जागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 5:23 PM