नाशिक : शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुमारे दीड महिना कडेकोट टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात आली होते. त्यामुळे अनेक तरुणांचे रोजगार गेले असून यातील काही लोक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात पत्रक वाटप करून व ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांमध्ये स्वत:च्या व कुटुंबियांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि हाताला कामधंदा नसल्याने काही तरुण मंडळी गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील चेनस्नॅचिंग, चोरी, घरफोडी, जबरी चोरी, पोलिस असल्याची बतावणी करून लुटमार करणे व हातचालखी करून व संमोहीत करून दागीने चोरी करण्याच्या प्रकारांसह जनावरांची चोरी, घराबाहेर ठेवलेल्या वस्तूंची चोरी, मोटारसायकल चोरी, बँकेत जाणाऱ्या येणाऱ्यांची लुटमार करून पैशांची चोरी, अंगावर कचरा फेकून पैसे चोरी करणे किंवा मोटारसायकल, चारचाकी वाहनातील पैसे चोरणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा घटनेचा धोका नागरिकांना तत्काळ लक्षात यावा व नागरिक अशा घटनांना बळी पडू नये, नागरिकांनी नेहमी सतर्क राहावे त्याचप्रमाणे ऑनलाईन पेमेंट करताना खबरदारी घ्यावी अशा स्वरुपाची जनजागृती करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी जनावरे व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी बांधून चोरी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात इंदिरानगर ,उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत पोलीस असल्याचे सांगून चार तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व पोलिस उपायुक्त विजय खरात व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांचे मार्गदर्शनानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर व कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी सतर्क राहावे अशा आशयाचे जनजागृती पत्रक वाटप करून नागरिकांना सावध राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांकडून पत्रक वाटून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 5:32 PM
टाळेबंदीच्या काळात तरुणांचे रोजगार गेल्याने का काही लोक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात पत्रक वाटप करून व ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांमध्ये स्वत:च्या व कुटुंबियांच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
ठळक मुद्देइंदिरानर, उपनगर परिसरात पोलिसांकडून जनजागृतीनागरिकांना गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन