मनोज देवरे, कळवण : शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये शासनाने मे व जून महिन्याचे नियमित धान्य मोफत देण्याची घोषणा केली. परंतु काही स्वस्त धान्य दुकानदारांनी गैरप्रकार करीत कुठे विकत तर कुठे धान्यच न देण्याचा प्रकार कळवण तालुक्यात ग्रामस्थांनी उघड केला. यामध्ये ग्रामस्थांनी दाखवलेली जागरुकता आणि सजगता महत्त्वाची ठरली. त्यामुळेच या गैरप्रकारांना काही अंशी पायबंद बसू शकेल.
कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पुणेगाव आणि पुनंद खोऱ्यातील रवळजी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या संदर्भात ग्रामस्थांनी निवेदन देऊन तोंडी तक्रार करताच महसूल यंत्रणेने दुकानदारांच्या कारभाराचा पर्दाफाश केला. त्यामुळे अन्य दुकानदार खडबडून जागे झाले आहेत. कळवण तालुक्यात रेशन दुकानदारांचा काळाबाजार तालुक्याला आणि जनतेला नवीन नाही. दुकानदारांचा मनमानी कारभार अन् गैरप्रकारातून कळवणला मोर्चे, प्रतिमोर्चा निघाले आहेत. पुणेगाव आणि रवळजीच्या दुकानाच्या कारभारामुळे मागील इतिहासाचे या निमित्ताने स्मरण होते.
पुणेगाव व रवळजी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारीनंतर कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे यांनी पुरवठा निरीक्षक रमेश गायकवाड व पुरवठा विभागाला चौकशीचे आदेश दिले. त्यात गैरप्रकार समोर आल्याने पुणेगाव (खडकी) येथील दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. रवळजी येथील दुकानाचा परवाना रद्दचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविला असून तो परवाना देखील रद्द होण्याच्या मार्गावर आहे. गैरप्रकारामुळे यापूर्वी धनोली, इन्शी या दोघांचे परवाने निलंबित केले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचा रोजगार गेल्याने शासनाने प्राधान्य आणि अंत्योदय गटातील रेशनकार्डधारकांना नियमित धान्यासोबत गहू व तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दुसऱ्या लाटेतही लॉकडाऊन करण्यात आल्याने राज्य शासनाने मे महिन्यात तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे आणि जून महिन्यात नियमित धान्य मोफत देण्याची घोषणा केली. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना दिले. वितरण व्यवस्थेद्वारे तालुक्यातील लाभार्थींसाठी मे आणि जून महिन्यात प्रत्येकी १६ हजार ६०० क्विंटल सरासरी धान्य आले.
रवळजी येथील स्वस्त धान्य दुकानात मे महिन्यासाठी प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आलेले धान्य ३४ अंत्योदय व २७७ प्राधान्य कुटुंबीयांतील लाभार्थींना वाटप केले नसल्याचे पुरवठा निरीक्षकांच्या चौकशीत निदर्शनास आले. शिवाय शिल्लक धान्य दुकानात आढळून आले नसल्याने त्या धान्याची इतरत्र विक्री झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. तक्रारीवरून स्वस्त धान्य दुकानाचा पंचनामा करून दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली. परवाना रद्दचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविला असून परवाना रद्द होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इन्फो
कारवाईचा बडगा
सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंत्योदय गटातील प्रतिकार्डधारकाला १५ किलो गहू आणि १० किलो तांदूळ, १० किलो मका तर प्राधान्य गटातील कार्डधारकांना प्रतीव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत देणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु पुणेगाव येथील दुकानदाराला मे महिन्यात ९२० लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंबासाठी तांदूळ व गहू तर अंत्योदय कुटुंबासाठी तांदूळ, गहू व मका मोफत वाटपासाठी आले होते. त्यात १४४ लाभार्थींना मोफतचे धान्य देण्याऐवजी विकत धान्य दिल्याची लेखी तक्रार पोलीस पाटील द्वारकानाथ गायकवाड यांनी केली होती. चौकशीत गैरप्रकार समोर आल्याने यंत्रणेने कारवाईचे हत्यार उपसून परवाना रद्द केला.
इन्फो
दृष्टीक्षेपात कळवण तालुका
स्वस्त धान्य दुकानदार - १५०
शिधापत्रिकाधारक - ३९,०३१
प्राधान्य कुटुंब - २७,३५३
अंत्योदय कार्डधारक - ८४३९
केशरी कार्डधारक - ३०६७
शुभ्र कार्डधारक - १७२
फोटो- २४ रेशन दुकान