नाशिक : राज्य कोणत्याही पक्षाचे असले तरी अर्थसंकल्पात कपात करायची असेल तर लेखक, वृद्ध कलावंत, ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळते. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसारखे अत्यल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी, वृद्ध कलावंत, लेखक यांना लक्ष्य केले जाते. हे म्हणजे राजाचा अंगरखा फाटला म्हणून द्वारपालाचे फाटके धोतर ओढणे कितपत योग्य आहे, असेही पाटील यांनी नमूद करीत साहित्यावरच कुऱ्हाड मारणाऱ्या राजकारण्यांवर आसूड ओढला.
नाशिकमधील ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या भूमिकेतून केलेल्या भाषणात पाटील बोलत होते. यावेळी विश्वास पाटील यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि नाशिकच्या ऐतिहासिक पाऊलखुणांचा धांडोळा घेतला. यावेळी बोलताना पाटील यांनी नाशिकमधील तात्यासाहेब शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांची घरे ही माझ्यासाठी अजिंठा-वेरूळ असून, नाशिकशी घट्ट ऋणानुबंध असल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे येथील भागोजी नाईक यांनी १८५७ साली केलेले भिल्लांचे बंड इतके मोठे होते की त्या नाईक यांना कपटाने पराभूत करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ब्रिटनच्या राणीने व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची आठवणदेखील पाटील यांनी सांगितली. शाहीर परशुराम यांच्या नावाने मंदिर बांधणारे वावी हे गाव अशी नाशिकची वेगळी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवाजी महाराजांचे राज्य छोटे, मात्र त्यांच्या तत्कालीन न्यायाची, आदर्श राज्याची वाखाणणी त्यावेळच्या ब्रिटिश, फ्रेंच, डच कागदपत्रांमध्ये आढळतात. मात्र, त्या शिवरायांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या खाणाखुणा यांचे आपण जतन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बंगालीत महाश्वेतादेवी, तमिळमध्ये जयकांतन तसेच आपल्या मराठी साहित्यातील प्रख्यात लेखक अण्णा भाऊ साठे यांचे महान साहित्य असूनही त्यांना ज्ञानपीठ न मिळाल्याची खंत वाटते, असेही पाटील यांनी नमूद केले. जर तमिळ किंवा अन्य दाक्षिणात्य भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळतो, तर २ हजार वर्षांहून अधिक पुरातन भाषा असलेल्या मराठीला तो मिळायलाच हवा, असेही पाटील यांनी नमूद केले.
इन्फो
शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या स्मृती जपणे हेच कर्तव्य !
शिवरायांच्या स्मारकाचा विचार करताना तो अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा करण्याचा विचार हा आक्रस्ताळेपणा आणि अविचार ठरेल. त्यापेक्षा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गडकिल्ल्यांच्या रूपात असलेल्या पाऊलखुणा जपणे, हे आपले कर्तव्य असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी सांगितले.